माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत.
'ग्रेस' या नावाविषयी
इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.
0 Comments