भाऊराव पाटील (सप्टेंबर २२, इ.स. १८८७; ८, महाराष्ट्र - मे ९, इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वस्तीग्रह मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -
- शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
- मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
- निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
- अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे.
- संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
- सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
- बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
सौर्से : विकिपीडिया
0 Comments